नीट पेपरफुटी प्रकरण, मोबाईलमधील प्रश्न आणि मुख्य परीक्षेतील प्रश्न सारखेच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. लातूर येथील आरसीसी क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाचे सर्वच्या सर्व ४५ प्रश्न जसेच्या तसे आढळल्याची खळबळजनक माहिती सीबीआयच्या तपासातून उघड झाली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या अहवालानंतर सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये ही माहिती समोर आली. यामुळे मोटेगावकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
सीबीआयच्या तपासादरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिलेल्या माहितीनुसार नीट परीक्षेसाठी प्रत्येकी १८० प्रश्नांचे चार ‘मास्टर सेट’ तयार केले जातात. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नांचा समावेश असतो. या चारपैकी दोन संचांची छपाई करून ते परीक्षा केंद्रांवर वितरीत केले जातात. २०२६ च्या परीक्षेसाठी ‘कैलास’ आणि ‘शिवालिक’ हे दोन प्रशासकीय कोडनाव असलेले संच वापरण्यात आले होते.
सीबीआयने मोटेगावकर यांच्या फोनमधून जप्त केलेल्या रसायनशास्त्राच्या प्रश्नांची तुलना या मास्टर सेटशी केली असता थक्क करणारी माहिती समोर आली. शिवालिक सेट या संचातील रसायनशास्त्राचे सर्वच्या सर्व ४५ प्रश्न मोटेगावकर यांच्या फोनमध्ये जप्त केलेल्या डाक्यूमेंटमधील प्रश्नांशी तंतोतंत जुळले आणि कैलास सेटमधील संचातील ४५ पैकी ४३ प्रश्न लीक झालेल्या दस्तऐवजाशी जुळले. याशिवाय दुस-या मास्टर सेटमधील ४० प्रश्न तर तिस-या सेटमधील १ प्रश्न लीक झालेल्या माहितीशी जुळला असल्याचे समोर आले असल्याचे पुरवणी अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीच्या जलद गती न्यायालयात २८ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये १३ जणांना आरोपी करण्यात आले. यामध्ये एनटीएच्या बायोलॉजी तज्ज्ञ मनीषा मांढरे, केमिस्ट्री तज्ज्ञ प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि फिजिक्स तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार यांच्या नावांचा समावेश आहे.
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम,
एअरड्रॉपद्वारे गैरप्रकार
तपासादरम्यान परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि एअरड्रॉपच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका आणि त्याच्याशी संबंधित साहित्य पसरवण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब, हस्तलिखित नोट्स आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे संदेश तपासून संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला आहे.
सराव परीक्षेच्या नावाने
मुख्य प्रश्नांचा सराव
आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या ‘मॉक टेस्ट’च्या (सराव परीक्षा) प्रश्नपत्रिका दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. १९ एप्रिल रोजी घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये ‘कैलास’ मास्टर सेटमधील १५ प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आले होते. ३० एप्रिलच्या मॉक टेस्टमध्ये ‘शिवालिक’ सेटमधील ६ प्रश्न आणि दुस-या सेटमधील ५ प्रश्न समाविष्ट होते. आरोपी शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या फोनवरून ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान जप्त करण्यात आलेल्या १३ प्रश्नांच्या इमेज तज्ज्ञांच्या अहवालानुसार चारही मास्टर सेटशी जुळल्या आहेत.
















