प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
वीटभट्टीवर काम करणा-या दोघा कामगारांमध्ये मोबाईल घेतल्यावरुन दारूच्या नशेत रविवार दि. २५ऑक्टोबर रोजी सायंकाळी भांडण झाले होते. त्यानंतर दुस-या दिवशी झोपेत असताना ४० वर्षांच्या कामगाराचा मोबाईल घेतल्याच्या संशयावरून डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. कंदलगाव हद्दीतील दीक्षित वीट भट्टीवर मंगळवारी पहाटे तीन वाजण्यापूर्वी ही खूनाची घटना घडली. मंद्रूप पोलिसांनी कौशल्याने तपास करत चार तासांत आरोपीला अटक केली.
बुध्दाप्पा तिपण्णा देसाई (वय ४०, रा. शेषगिरी, ता. इंडी, जि. विजयपूर) अशी खून झालेल्या वीटभट्टीवरील कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संजय परशुराम धरेनवर (रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजयपूर) यास अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, कंदलगाव-गावडेवाडी रस्त्यावर कंदलगाव हद्दीत दीक्षित यांची वीटभट्टी आहे. येथे कर्नाटकातील इंडी तालुक्यातील कामगार कामाला आहेत. रविवारी सायंकाळी मयत बुद्धाप्पा देसाई व आरोपी संजय धरेनवर यांच्यात मोबाईलवरून भांडण झाले.
संजय यांनी बुद्धाप्पा याला माझा मोबाईल तू घेतला आहेस असे म्हणत त्याच्या पत्नीसमोर दारूच्या नशेत मारहाण केली होती. त्यानंतर दोघांचे भांडण सोडविण्यात आले. सोमवारी रात्री बुद्धाप्पा हे वीटभट्टीवरील आपल्या झोपडीत झोपले होते. तेव्हा पहाटे तीन वाजण्यापूर्वी आरोपी संजय हा तेथे गेला. मोबाईल गेल्याच्या रागातून त्याने एक मोठा दगड उचलून मयत बुद्धाप्पा याच्या डोक्यात घातला. रक्तबंबाळ झाल्याने बुद्धाप्पा याचा जागी मृत्यू झाला.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे डीवायएसपी गणेश शिंदे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पीएसआय अमितकुमार करपे, राज डांगे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, पीएसआय खाजा मुजावर यांच्या टीमने तपास सुरू केला. संशयित आरोपी संजय धरेनवर यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने खून केल्याचे कबूल केले.
















