छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा ३-२ अशी पिछेहाट झाली. यामुळं महायुती अंतर्गत तुतू-मैमै सुरु झाली आहे. याचपार्श्वभूमीवर औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलेले शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महायुतीला आरसा दाखवला आहे. मराठवाड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयात आपला खारीचा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले असून ७० टक्के महाराष्ट्रानं महायुतीला नाकारले असें सांगत हा धोक्याचा इशारा असल्याचंही म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या टीकेला उत्तर दिलं तसंच महायुतीला भविष्यात कुठल्या परिणामांना समोरे जावे लागू शकते हे देखील त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर महायुतीतल्या प्रत्येक पक्षानं या निवडणुकीनंतर आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसने तर सखोल परीक्षण करणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
सत्तार म्हणाले, मराठवाड्यात जे झालंय त्या विजयात माझा खारीचा वाटा आहे, प्रत्येकाला त्यावेळी मी जागृत करण्याचं काम केलं की महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हा माणूस प्रत्येकासाठी कसा घातक आहे, का आहे. गेली १८ वर्षे आम्ही त्यांच्यासाठी मतं मागितली पण त्यानंतरही त्याचं रुप पाहिल्यानंतर अनेक लोकांमध्ये नाराजी होती, पण तरीही त्यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. पण आम्ही त्यांच्याविरोधत थेटपणए उतरलो, कुठेही लपून-छपून प्रचार केला नाही. त्यामुळं आज आपण पाहिलं की, १८ वर्षांचा त्यांचं साम्राज्य संपलं. आमचा प्रत्येक मतदारानं ईश्वर, अल्लाह, भगवानला साक्षी ठेवून मतदान केलं. यासाठी केलं की सतीश चव्हाणांनी १८ वर्षांत कोणतंही काम केलं नव्हतं त्याचं त्यांना फळ मिळालं आहे.
बन आणि त्यांची भणभण माहिती नाही
माझ्यावर टीका करणारे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि त्यांची भणभण मला माहिती नाही मी त्यांना जवळून पाहिलेलं नाही. टीव्हीवरच मी पाहिलंय. पहिल्या विधानपरिषदेला मी युतीचा धर्म पाळला, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिरसाटांना निवडून आणण्यासाठी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंर्त्यांनी सांगितलं, मी त्यांच्या आदेशाचं पालन केलं, त्यामुळं भाजपचा उमेदवार निवडून आला. त्यामुळं कादाचित बन यांना याची माहिती नसेल, त्यामुळं माझ्याविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मी स्वत: निवडून आणला आहे.
राष्ट्रवादीनं सखोल आत्मपरिक्षण करावे
तसंच महायुतीतील लोक जेव्हा अधिकृतपणे विरोध करु लागतात तेव्हा त्यामागची कारण शोधणं गरजेचं आहे. त्यामुळं आत्मपरीक्षण करणंही गरजेचं आहे. मी पाच वेळेचा आमदार आहे, ४० वर्षापासून राजकारण करतो आहे. अनेकवेळी मी राज्याच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ का येते याचा आत्मपरीक्षण व्हावं असं वाटतं त्यांनी भाजपच्या लोकांनी त्यांच्या पक्षाला, आमच्या पक्षानं आम्हाला विचारावं आणि राष्ट्रवादीनं तर याची पूर्ण चौकशी करुन असं का घडतंय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
















