तेहरान : आखाती देशांमधील वाढत्या तणावाने आता भीषण रूप धारण केले असून अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले संकेत अखेर खरे ठरले असून मंगळवारी सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये वसलेल्या इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या केशम बेटावर अनेक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनीही या स्फोटांना दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांसाठी आजच मतदान होत असून या राजकीय घडामोडींदरम्यानच हा हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका अमेरिकन अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील काही वेढलेल्या इराणच्या महत्वाच्या ठिकाणांवर बचावात्मक हल्ले केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेच्या अध्यक्षांवर इराणविरुद्ध आणखी एक मोठी लष्करी कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होते, जेणेकरून निवडणुकांनंतर हल्ले पुन्हा एकदा नव्याने सुरू करता येतील.
ट्रम्प इराणवर अण्वस्त्र डागण्याच्या तयारीत
दरम्यान, या संभाव्य लष्करी संघर्षामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये तणाव निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत अमेरिकेच्या अनेक प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी आणि पश्चिम आशियाई देशांनी या नव्या हल्ल्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे आगामी काळात आखातातील संघर्ष अधिक पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण जगाचे या परिस्थितीकडे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांनी इराणवर अण्वस्त्र हल्ला करावा, याच्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे प्रचंड दबाव आणत आहेत. त्यामुळे ट्रम्प हे इराणवर येत्या काही दिवसांमध्ये अण्वस्त्र हल्ला करू शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.
टी. कार्लसन यांचा दावा
अमेरिकेतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक टी. कार्लसन यांनी सोशल मीडिया एक्स वर एक पोस्ट टाकून हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार इराणमधील पिपॅक्स माऊंटन या ठिकाणी अमेरिकेकडून अण्वस्त्र हल्ला केला जाऊ शकतो. याच ठिकाणी इराणने अणुऊर्जा आणि युरेनियम समृद्ध करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याचा दाट संशय अमेरिकेला आहे. हा परिसर अतिशय कठोर अशा ग्रेनाईट दगडांचा आहे. त्यामुळे तेथे पारंपरिक शस्त्रांचा प्रभाव पडत नाही. म्हणूनच या ठिकाणी अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करण्यात येत असल्याचे कार्लसन यांनी सांगितले.
















