27.5 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार अपात्रता प्रकरण : नार्वेकर-शिंदे भेटीवर शरद पवारांनी व्यक्त केला संशय

आमदार अपात्रता प्रकरण : नार्वेकर-शिंदे भेटीवर शरद पवारांनी व्यक्त केला संशय

मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी (ता. १०) दुपारी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. या संपुर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, साधी सरळ गोष्ट आहे, ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांनी ती मांडणं यात काही चुक नाही. पण, ज्याच्याकडे केस मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच जर ज्यांची केस आहे, त्यांच्याकडे जात असतील तर शंकेला, संशयाला जागा निर्माण होते. जर हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा चांगली राहिली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली. त्यानंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्या म्हणण्यानुसार, कोणताही स्पष्ट निकाल न देता सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्याचा पर्याय अध्यक्षांकडे नाही. त्यांना एक निकाल द्यावा लागेल. अध्यक्षांनी कोणत्याही बाजूने निकाल दिला तरी ते प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाणारच आहे. यातला मधला मार्ग काढणे अपेक्षित नाही. त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवावे लागेल. ते तटस्थ निकाल देऊ शकत नाहीत.

तसेच शिंदे गटात खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक आमदार असल्याने शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरण्याची शक्यताही कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

काय होऊ शकते?

पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात येऊ शकते.

‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. परंतु पक्षात बंड होत असताना किंवा सूरत ते गुवाहाटीला आमदार गेले त्यावेळी मात्र पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हते, असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला होता. याचा अर्थ अध्यक्ष कसा लावणार हे पाहावे लागणार आहे.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यास त्यांना एकतर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवावे लागेल किंवा यातून काही सुवर्णमध्य साधत ते काही वेगळा निकालही देऊ शकतात का, हे पहावे लागेल.

शिवसेनेत फूट की नेतृत्व बदल
शिवसेना पक्षात फूट झाली आहे की नेतृत्व बदल झाला आहे, यावर निश्चित निर्णय द्यावा लागेल. केवळ नेतृत्वच बदल झाला आहे, असे सिद्ध झाल्यास कुठल्याच गटातील आमदार कदाचित अपात्र ठरणार नाहीत.

निकाल अमान्य झाल्यास हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR