नवी दिल्ली : वृत्तसंस्था
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा असून, देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यापार होण्याचा अंदाज आहे, त्यात ७० हजार कोटी रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा वाटा आहे.
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतच्या संपूर्ण सणासुदीच्या हंगामातील एकूण उलाढाल ७ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ ते १८ टक्के वाढ अपेक्षित आहे. या अंदाजात वस्तूंच्या विक्रीबरोबरच सेवाक्षेत्रातील उलाढालीचाही समावेश आहे, अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) हा अंदाज वर्तवला आहे.
अखिल भारतीय ज्वेलर्स आणि सुवर्णकार महासंघाच्या (एआयजेएफ) म्हणण्यानुसार, किमती वाढूनही ग्राहक खरेदी करत आहेत. हलके दागिने, चांदीची नाणी आणि पारंपरिक भेटवस्तूंना मागणी वाढली आहे. सोन्याचे दर वाढले असले तरी ग्राहक आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार खरेदी करत आहेत.
बाजारात १४ आणि १८ कॅरेट सोन्याच्या हलक्या दागिन्यांना पसंती मिळत आहे. चांदीची नाणी, सजावटीच्या वस्तू तसेच मत्स्य, कासव आणि हत्ती यांच्या शुभ प्रतिकृतींनाही मागणी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उलाढाल जवळपास १० टक्के अधिक असेल. याशिवाय भांडी, घर सजावटीच्या वस्तू आणि सणासुदीच्या साहित्याचीही खरेदी होत आहे.
सोन्याचे दर मागील वर्षापेक्षा २० टक्के अधिक
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत दर सुमारे २० टक्क्यांनी अधिक आहेत. वृत्त प्रसिद्ध होताना २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ४१ हजार ८४० रुपये होता. शहरे आणि ग्रामीण बाजारपेठांचा वाढता सहभागही महत्त्वाचा ठरत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादनांच्या मागणीला चालना मिळाली आहे. वाहतूक, हॉटेल, पर्यटन, खानपान आणि कार्यक्रम व्यवस्थापन यांसारख्या सेवा क्षेत्रांतून ८० हजार कोटी ते १ लाख कोटी रुपयांच्या व्यापाराची अपेक्षा आहे. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीचा फायदा विक्रेत्यांनाच नव्हे, तर संबंधित सेवा क्षेत्रांनाही मिळत आहे.
















