मुंबई : रणबीर कपूर आणि यश यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित रामायण: राइज ऑफ अ लेजेंड हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या दुस-या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, या चित्रपटाने जगभरातील कमाईच्या बाबतीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत नवा विक्रम नोंदवला असून जगभरात १२०० कोटींची कमाई केली आहे.
रामायणने प्रदर्शनाच्या अवघ्या दहा दिवसांत हिंदी भाषेत ५०० कोटी आणि देशभरात ८०० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम करणारा रामायण दुसरा सर्वात वेगवान चित्रपट ठरला आहे. या कामगिरीसह चित्रपटाने पुष्पा २, धुरंधर आणि जवान यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे.
दुस-या शनिवारी कमाईत मोठी वाढ
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतरही रामायणला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या दुस-या वीकेंडमध्येही बॉक्स ऑफिसवरील कमाईचा वेग कायम असल्याचे दिसून आले. दुस-या शनिवारी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने अंदाजे ५३.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे हिंदीतील एकूण नेट कलेक्शन ५२५ कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चित्रपटाच्या कमाईत ४७.३ टक्क्यांची वाढ झाली. शनिवार हा कोणताही मोठा सण किंवा सार्वजनिक सुट्टीचा दिवस नसतानाही चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यावरून रामायणची लोकप्रियता केवळ दिवाळीच्या सुट्यांपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट होते.
















