छत्रपती संभाजीनगर : पुणे येथून नागपूरला जाणा-या खासगी ट्रॅव्हल्सचा संभाजीनगर-जालना रोडवर फत्तेपूर शिवारात रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अपघात झाला. पुलाचे कठडे तोडून बस उलटली. यात १ जण ठार, एक गंभीर जखमी, तर २७ किरकोळ जखमी झाले.
अपघातावेळी सागर गंगाधरराव सपाटे (३९, रा. अमरावती) हा बस चालवत होता, तर जगन्नाथ थोरात हा बदली चालक होता. सागरवर पुणे ते संभाजीनगरपर्यंत बस चालवण्याची जबाबदारी होती. मात्र, संभाजीनगरच्या पुढे ५ किमीवरील हॉटेलवर थांबू, असे म्हणत त्याने बस पुढे नेली आणि तिचा अपघात झाला.
पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास – फत्तेपूर शिवारात झोपेची डुलकी आली आणि नियंत्रण सुटून बस थेट कठडा तोडून नाल्यात कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. मृत साई २६ ऑक्टोबरला पुण्यात कामाला गेला होता. दिवाळीमुळे बदली चालक, क्लीनर व हेल्पर यांची मागणी जास्त आहे. त्यामुळे तो १५ दिवसांपूर्वी हेल्पर म्हणून १८ हजारांवर कामाला लागला. त्याला सोशल मीडियाची प्रचंड आवड होती, मात्र त्याच्याकडे स्वत:चा मोबाइल नव्हता. इतरांचा मोबाइल घेऊन तो इन्स्टाग्राम पाहत असे.
















