पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौ-यानिमित्त रविवारी (१५ नोव्हेंबर) आणि सोमवारी (१६ नोव्हेंबर) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहाँगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रीकी महाविद्यालय चौक, नेहरु मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.
सोमवारी (१६ नोव्हेंबर) अमित शाह यांचा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने कार्यक्रम संपेपर्यंत सोमवारी सकाळी नऊनंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल, पेरुगेट पोलिस चौकी ते पावन मारुती मंदिर, भरत नाट्य मंदिर परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी सातनंतर किराड चौक ते नेहरु मेमोरिअल हॉल चौक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणा-या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हॉटेल ब्ल्यू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्ल्यू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलिस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर, ब्ल्यू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
















