सांगली : महाराष्ट्रात पालघर येथे नवे खासगी एमबीबीएस कॉलेज सुरू होत असून या ठिकाणी ५० जागा उपलब्ध आहेत. मात्र सीईटी सेलमार्फत हे नवीन कॉलेज १३ नोव्हेंबरला रात्री दहा वाजता सीट मॅट्रिक्समध्ये दाखवण्यात आले. प्रेफरन्स लिस्ट भरण्याची मुदत १४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंतच होती. निवड यादी १४ तारखेला रात्री उशिरा जाहीर होणार होती, तर प्रवेश घ्यायला १६ तारखेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली.
याआधी ज्यांना एमबीबीएस, बीडीएसला प्रवेश मिळालेला आहे, त्यांना या नवीन कॉलेजला प्राधान्य देता येत नसल्याने त्यांची निराशा झाली. तसेच ज्यांनी यापूर्वी आयुष किंवा इतरत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता, त्यांना निवड झाल्यास इतक्या कमी वेळेत आधीच्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश रद्द करणे, कागदपत्रे घेऊन येणे आणि नवीन कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे यासाठी अत्यंत कमी मुदत मिळणार आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढणे किंवा आरटीजीएस करणे यासाठी फक्त सोमवारीच मुदत आहे. त्यामुळे त्याची पूर्तता करून कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे हे अनेकांच्या दृष्टीने जवळपास अशक्यप्राय आहे. मेडिकल काउन्सलिंग कमिटीने १६ तारखेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी राज्यांना मुदत दिली असल्याने सीईटी सेलला देखील घाईगडबडीत ही प्रवेश फेरी पार पाडावी लागली.
सर्वांना मानसिक त्रास
महाराष्ट्रात एमबीबीएसच्या ५० जागा वाढल्या ही चांगली गोष्ट असली तरीही शेवटच्या क्षणी असे नवीन कॉलेज आल्याने अनेक मेरिटच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही. त्यांच्यावर हा निश्चितच अन्याय आहे. घाईगडबडीत सर्व प्रवेशाची पूर्तता करणे विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने मानसिकदृष्टया अतिशय त्रासाचे असल्याचे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाचे समुपदेशक डॉ. परवेज नाईकवाडे यांनी सांगितले.
















