मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आपल्यापुरता आणि आपल्या पक्षापुरता संपला आहे, आता त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ? असे सांगत शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शनिवारी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विलीनीकरणाबाबत अजित पवार गटाकडून आपल्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत संसदीय समितीच्या कामकाजानिमित्त भेटी झाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही, अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सध्या होत नसल्याचे अजित पवार गटाने आधीच स्पष्ट केले होते.
विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही : मुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असून, त्यातून पतंगबाजी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, अद्याप तरी आमच्याशी विलिनीकरणाबाबत कोणीही चर्चा केलेली नाही. अशी चर्चा सुरू असती, तर संबंधितांनी आम्हाला किमान त्याची कल्पना दिली असती. प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणीही काही सांगितलेले नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आनंदच : भुजबळ
शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होऊन सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आनंदच होईल, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. विलीनीकरणासंदर्भात जोपर्यंत सुनेत्रा पवार निर्णय घेणार नाहीत, तोपर्यंत चर्चांना काही अर्थ नाही, असेही भुजबळ म्हणाले.
















