मुंबई : प्रतिनिधी
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या नामकरणाला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वत: मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानकाच्या नामकरणाची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ आणि ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात सुमारे १५ लाख अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विविध विभागांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन, रेल्वे, मुंबई महापालिका तसेच आंबेडकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दादर स्थानकाच्या नामकरणाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकारने या मागणीला तत्त्वत: मान्यता देऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक कार्यवाही करण्याबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर नामकरणाची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
१५ लाख अनुयायांसाठी सुविधांचे नियोजन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या विविध भागांतून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. यंदा ७० वा महापरिनिर्वाण दिन असल्याने ५ आणि ६ डिसेंबर रोजी अनुयायांची संख्या सुमारे १५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन निवास, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि वाहतुकीच्या सुविधांचे योग्य नियोजन करावे. मागील वर्षांच्या अनुभवातून समोर आलेल्या त्रुटी दूर करून सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. चैत्यभूमी परिसरात शांतता आणि शिस्त कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये आणि अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांना अधिकृत बंदी घालण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
इंदू मिल स्मारकासाठी वाढीव निधी देणार
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. यासंदर्भात पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्यात येईल, असे मुख्यमंर्त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तपासून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य राखून उत्सवी कार्यक्रमांऐवजी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट आणि विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
अनुयायांची गैरसोय होऊ देणार नाही : एकनाथ शिंदे
चैत्यभूमीवर येणा-या लाखो अनुयायांसाठी निवास, विश्रांती आणि भोजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी मोठे मंडप आणि जर्मन हँगर उभारण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक, पोलिस बंदोबस्त आणि रेल्वे सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणा-या वाहनांना टोल सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर येणा-या अनुयायांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. आरोग्य सुविधांसह सर्व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे असे त्यांनी नमूद केले.
















