लातूर : प्रतिनिधी
दीपावलीच्या तोंडावर व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात भेसळ करुन त्याची विक्री केली जाऊ शकते.यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करुन ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
दीपावली अवघ्या कांही दिवसावर आली आहे. या काळात खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा गैरफायदा घेऊन कांही व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात भेसळ करुन त्याची विक्री केली जाऊ शकते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. याशिवाय वस्तूंच्या किमती वाढवून विक्री केली जाते. कांही वेळा वस्तूंचे वजन कमी करुन त्या ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.हे प्रकार टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने पथकांची स्थापना करुन विक्री होणा-या अन्नपदार्थांची तपासणी करावी. उघड्यावर होणारी खाद्यपदार्थांची विक्री थांबवावी. यात दोषी आढळणा-या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले-पाटील, मंजुश्री ढेपे-पाटील, कौशल्या मंदाडे, अश्विनी बने, रबिया सय्यद यांच्या स्वाक्ष-या आहेत. नागरिकांनीही वस्तू खरेदी करताना त्यात भेसळ आढळली तर संबंधित विभागाकडे तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील यांनी केले आहे.