नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केल्यापासून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पक्षाने विधेयकाला पाठिंबा देत असल्याचा निर्णय शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी कठोर टीका केल्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनीही पवारांच्या पक्षावर टिकेचे आसूड ओढले आहेत. शरद पवारांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवले. आता त्यांनी मोदी-शहांना पाठिंबा दिला असेल तर पवारांच्या राष्ट्रवादीवर भविष्यात महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही. एवढेच नाही तर त्यांनी मोदी-शहांच्या बाजूने मतदान करू द्या मग त्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कठोर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी आत्मचिंतन करून मतदान करावे. त्यांनी महाराष्ट्रविरोधी मतदान केल्यास त्यांचा एकही उमेदवार जिंकून येणार नाही. त्यांनी मोदी-शहांच्या बाजूने मतदान करू द्या मग त्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळेल. अमित शहा, मोदी तुमच्या प्रचाराला आले नव्हते. त्यामुळे तुम्ही भाजपसोबत जात असाल तर अनिल देशमुख, नवाब मलिक यांची माफी मागा, असे खडेबोल संजय राऊत यांनी सुनावले आहे. तसेच आता तुम्ही कुणीही खुलासे करू नका, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असेही राऊतांनी सुनावले आहे.
यावेळी संजय राऊत यांनी डिलिमिटेशनसाठी खासदार १५० कोटींना विकले गेल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. तसेच पवारांच्या पक्षाला शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्या नेत्यांनी आता यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जाऊ नये, असे सांगतानाच आमचे खासदार फोडल्यानंतरही आम्ही अमित शहांच्या पायाशी गेलो नाही, असे सुनावले. शरद पवार यांच्या सहका-यांनी माती खाल्ली. या विधेयकाला पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लागलेली ठेच आहे. यानंतर तुम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंब्याची भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी पवारांना सुनावताना ही बेईमानी महाराष्ट्र सहन करणार नाही, असेही स्पष्ट केले.
















