मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले. तसेच त्यांनी नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. दरम्यान, नाशिकमधील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
३०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विकास प्रकल्पांचेही लोकार्पण करणार आहेत. अंदाजानुसार, दररोज सुमारे ७० हजार लोक या पुलावरून प्रवास करतील. येथे ४०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत, याशिवाय ट्रॅफिक प्रेशरची माहिती गोळा करण्यासाठी एआय आधारित सेन्सर बसवले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीघा रेल्वेस्थानकाचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून या रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागून राहिली होती.
विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा रेल्वे स्थानकावर दाखल होण्यापूर्वी चांगलाच राडा झाल्याचे बघायला मिळाले. दिघा स्थानकावर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. इतकेच नाही तर राजन विचारे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यातील बरेचशी विकासकामे ही महाविकास आघाडीच्या काळात झाली होती मात्र निमंत्रणाच्या पत्रिकेवर कुठेही ठाकरे गटाच्या नेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाने याविषयी नाराजी व्यक्त केली होती.