सातारा : लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्याने महायुतीची महत्वाची बैठक शुक्रवारी साता-यातील शासकीय विश्रामगृहावर झाली. १४ जानेवारी रोजी सातारा येथे महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून याचवेळी लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
यावेळी युतीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. तसेच यामध्ये साता-यात रविवारी होणा-या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले. तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.
सातारा येथील महायुतीच्या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीतील घटकपक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितंिसह नाईक-निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.