नागपूर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे सा-या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचीच प्रचिती आता सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये देखील होताना दिसत आहे. इंग्लंडची राजधानी लंडनच्या रामभक्तांनी तिथल्या मंदिरांमध्ये राम शिरा (हलवा) प्रसाद म्हणून वाटण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नागपूरचे शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून खास राम शिरा बनवून लंडनमध्ये मागवण्यात आला आहे.
हाच राम शिरा लंडनच्या विविध मंदिरांमध्ये प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी खास डीपफ्रीज केलेल्या राम शिरा प्रसादाचे १५ डबे नागपुरातून लंडनला पोहोचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे विष्णू मनोहर हे देखील अयोध्येत सात हजार किलोचा विक्रमी राम शिरा प्रसाद तयार करणार आहेत. त्यानंतर हा शिरा तेथील भाविकांना प्रसाद स्वरूपात वितरित केला जाणार आहे.
प्रसादाचे खास १५ डबे नागपुरातून लंडनला रवाना
अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. अशात विष्णू मनोहर हे देखील अयोध्येत २९ जानेवारीला सात हजार किलोचा विक्रमी राम शिरा प्रसाद तयार करणार आहेत.