‘मकरसंक्रांती’ या शब्दात दोन महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर, जो एक तारकासमूह आहे आणि संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे स्थित्यंतर. मकर ही रास म्हणून आपण ओळखतो. यासाठी आपल्याला वेध लागतात १४ जानेवारीचे. पण यावेळीप्रमाणे कधी कधी मात्र ही तारीख १५ जानेवारी असते आणि कदाचित वाचून आश्चर्य वाटेल की हीच संक्रांती इ.स. १००० मध्ये ३१ डिसेंबरला साजरी होत होती, तर ९००० वर्षांनी आपण हीच संक्रांती जूनमध्ये साजरी करू. काय आहे हे खगोलीय गुपित ?
मकरसंक्रांती! नव्या वर्षाचा पहिला सण! तिळाच्या खमंग वड्या आणि पोळ्या खात, एकमेकांशी गोड बोलण्याचे संकल्प करीत आणि वचने देत हा सण आपण साजरा करतो. भारतामधील भौगोलिक विविधतेमुळे हा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा होतो. या काळात हंगाम बदलत असल्यामुळे या बदलाला खूप महत्त्व आहे. ब-याच प्रदेशांमध्ये संक्रांती या नावानेच हा सण साजरा होतो, तर राजस्थान आणि गुजरातमध्ये उत्तरायण नावाने साजरा होतो. हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये माधी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये माघ बिहू किंवा भोंगली विह नावाने साजरा होतो. काश्मीरमध्ये शिशूर सेन्क्रात, केरळमध्ये मकरा विलाकू या नावाने साजरा होतो. भारताबरोबर नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया, म्यानमार या देशांमध्येदेखील संक्रांती साजरी केली जाते. सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, थंडीमध्ये शरीराचे संरक्षण करणे, नवीन निघालेल्या पिकांची पूजा करणे, याला सामाजिक, सांस्कृतिक आयाम तर आहेतच पण खगोलशास्त्रीय दृष्टीने खूपच महत्त्व आहे.
पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे. याला आयनांश असेही म्हणतात. पृथ्वीवर अनेक वले काम करीत असतात आणि त्यामुळे पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. जसे स्वत:भोवती ती फिरते, तशीच ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला परांचन गतीदेखील आहे. ही झुकलेल्या अक्षामुळे आहे. यामध्ये पृथ्वी एखाद्या झुकला भोव-यासारखीदेखील फिरते. यामुळे त्याचा एक परांचन कक्ष तयार होतो. यावर अनेक तारे आहेत. जेव्हा पृथ्वीचा उत्तर अक्ष परांचन कक्षेवरील ज्या ता-याकडे रोखलेला असतो तो त्यावेळी पृथ्वीचा ध्रुव तारा असतो. ही परांचन कक्षा पृथ्वी २६००० वर्षांमध्ये पूर्ण करते. साधारण ५००० वर्षांपूर्वी आपला ध्रुव हा ठुबान तारा होता. पुढे १२००० वर्षांनी आपला ध्रुव अभिजित तारा असेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्या अशा अनेक गतींमुळे आपल्याला विविध ऋतू अनुभवता येतात. मकरसंक्रांती या शब्दामध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर, जो एक तारकासमूह आहे आणि संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे स्थित्यंतर. मकर ही रास म्हणून आपण ओळखतो. यासाठी आपल्याला वेध लागतात १४ जानेवारीचे. पण कधी कधी मात्र ही तारीख १५ जानेवारी असते आणि कदाचित वाचून आश्चर्य वाटेल की हीच संक्रांती इ.स. १००० मध्ये ३१ डिसेंबरला साजरी होत होती, तर ९००० वर्षांनी आपण हीच संक्रांती जूनमध्ये साजरी करू. नावावरून आपल्याला या सणाचे संदर्भ लक्षात येतात. आपले सण हे आकाशातील बदलांशी आणि पर्यायाने ऋतूंशी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. प्रवेश करतो म्हणजे काय? तर सूर्याच्या पार्श्वभूमीवर मकर रास आपल्याला दिसते आणि महिनाभर ती या राशीमध्ये असते.
आपल्या राशीचक्रामध्ये मकर ही दहावी रास आहे. सुरुवातीपासून अंश मोजले तर ती बरोबर २७० अंशावर आहे. सूर्य जेव्हा या बिंदूवर येतो तेव्हा आपण असे म्हणतो की सूर्यान मकर राशीत प्रवेश केला. आपले बहुतेक सर्व सण हे हिंदू कॅलेंडरप्रमाणे आहेत. यात चंद्राची स्थिती ही प्रमाण स्थिती मानली जाते. त्यामुळे बहुतेक सर्व सणांच्या तारखा आपल्याला बदललेल्या दिसतात. हा एकमेव सण असा आहे की तो अनेक वर्षे एकाच तारखेला येतो. कारण तो सौर कॅलेंडरला अनुसरून आहे. संक्रांत ही सर्वसाधारणपणे १४ जानेवारी किंवा यावेळीप्रमाणे १५ जानेवारीला येते. पण ही स्थिती सध्याची आहे. कायम राहणारी नाही किंवा पूर्वीदेखील नव्हती. लिप वर्षामध्ये ही १५ जानेवारीला येते आणि एरवी १४ जानेवारीला, म्हणजे १४, १४, १४, १५ जानेवारी हे चक्र चालू राहते. गेली ४० वर्षे आपण याच पद्धतीने संक्रांत आलेली पाहत आहोत. परंतु २००९-२०१२ या चक्रामध्ये बदल दिसून आला. २००९ आणि २०१० मध्ये १४ जानेवारी आणि २०११ व २०१२ मध्ये १५ जानेवारी अशा तारखांना संक्रांत होती. हे चक्र पुढेही चालू राहील.
२०४९ ते २०५२ या चक्रामध्ये संक्रांत क्रमाने १४-१५-१५-१५ जानेवारीला अशी असेल. पुन्हा ४० वर्षांनी २०८९-२०९२ मध्ये १५-१५-१५-१५-१५ जानेवारी अशी संक्रांत असेल. २१०० मध्ये अजून वेगळेच काहीतरी घडणार आहे. जरी २१०० या आकड्याला ४ ने पूर्ण भागाकार होत असला तरी हे लिप वर्ष नसेल. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे जर एखाद्या वर्षाला १०० ने भाग जात असेल आणि जर ४०० ने पूर्ण भागता येत असेल तरच ते लिप वर्ष असू शकते. याचा अर्थ असा की, २१००, २२००, २३०० आणि १९०० ही लिप वर्षे नाहीत, पण २०००, २००४ मात्र आहेत. ज्या अर्थी २१०० हे वर्ष लिप वर्ष नाही. यात जास्तीचे दिवस मोजले जाणार नाहीत आणि यामुळे संक्रांत ही एक दिवसाने पुढे जाणार आहे. २१०१ ते २११४ या वर्षांमध्ये संक्रांती १६-१६-१६-१६ जानेवारी अशी येईल. हा असाच बदल १०० वर्षांनी होईल; पण केव्हा? जेव्हा वर्षाला १०० ने भाग जातो पण ४०० ने नाही आणि हे १०० वर्षांचे चक्र आणि ४० वर्षांचे चक्र एकाच वेळेस चालू राहते आणि या दोन्हींचा परिणाम होऊन संक्रांतीच्या म्हणजेच सूर्य संक्रमणाच्या तारखा बदलत जातील. या तारखा पुढे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण सूर्याभोवती एक फेरी पूर्ण झाली की एक वर्ष मानतो.
वर्षामध्ये आपण ३६५ दिवस मानत असलो तरी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास जो वेळ लागतो तो आहे ३६५ दिवस ५६ तास आणि ९ मिनिटे. यामुळे सूर्य मकर राशीमध्ये दरवर्षी ६ तास ९ मिनिटे उशिरा जातो. ही वरची ९ मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. कारण ४ वर्षांत संक्रांत २४ तास ३६ मिनिटांनी पुढे जाते. पण लिप वर्ष तिला फक्त २४ तासांनीच मागे खेचते. (लिप वर्षात जास्तीचा दिवस घेतल्यामुळे संक्रांत पुन्हा आधीच्या दिवशी येते.) ही साचलेली ३६ मिनिटे संक्रांतीला थोडे थोडे पुढे ढकलत राहतात. समजा यात सूर्य १ किंवा २ मिनिटे जरी उशिरा आला तरी हे चक्र ४४ वर्षांचे होते! आणि समजा तो १-२ मिनिटे लवकर आला तर हे चक्र ३६ वर्षांचे होते. या बदलाची गती पाहिली तर ७२ वर्षांनी एक दिवस संक्रांत पुढे जाते.
-सुजाता बाबर,
खगोल अभ्यासिका आणि विज्ञान लेखिका