कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या दराबाबत आक्रमक पवित्र घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले की, गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपयांच्या मागणीमध्ये आम्ही दोन पावले मागे येण्यास तयार आहोत, पण कारखानदार म्हणतील तोच दर आम्ही स्वीकारणार नाही. आता साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा. गेल्यावर्षीचा हिशेब पूर्ण झाला तरच यंदाचा गळीत हंगाम सुरू होईल, याची कारखानदारांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही मार्ग काढण्यासाठी एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत; मात्र कारखानदारांनी चिरीमिरी दिल्यासारखा दर समोर ठेवला आहे. यातूनही तोडगा काढण्यास आम्ही तयार नाही. आमची माझी मागणी ४०० रुपये दुसरा हप्ता द्या, अशी आहे. हा आग्रह सोडायला आम्ही तयार आहोत. यातून कारखानदार कोणता मार्ग काढतात ते सांगा. आम्हालाही संघर्ष नको आहे. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी अध्यक्षांशी चर्चा करून तत्काळ तोडगा काढावा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. शेट्टी म्हणाले की, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. मुश्रीफ यांनी यातून मार्ग काढण्यासाठी प्राथमिक स्वरूपात कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक घ्यावी, अशा सूचना केली होती.