22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टींसह अडीच हजार शेतक-यांवर गुन्हा दाखल

राजू शेट्टींसह अडीच हजार शेतक-यांवर गुन्हा दाखल

‘स्वाभिमानी’ला महामार्गावर ‘चक्का जाम’ करणे भोवले

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील पुलावर काल (गुरुवार) तब्बल आठ तास केलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर ऊसदराची कोंडी फुटली. मात्र, असे असतानाच आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तब्बल ८ तास पुणे-बंगळुरू महामार्ग रोखल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापूर पोलिस दलाच्या शिरोली पोलिस ठाण्यात शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाण्यातून नुकतीच देण्यात आली आहे. या गुन्ह्याबाबत राजू शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३००० रुपयांपेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणा-यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा काल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती.

महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्का जाम आंदोलन
सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आणि पहाटेपासून सुरू असणारी कार्यकर्त्यांची धरपकड झुगारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (गुरुवार) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तब्बल आठ तासांचे चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असली तरीही अवजड वाहनांची क-हाडपर्यंतच्या दुतर्फा रस्त्यांवर रांगाच-रांगा पहायला मिळाल्या. पुणे, मुंबईहून कागल, बेळगावला जाणारे आणि बेळगावहून पुणे मुंबईला जाणा-या वाहतूकदारांचे प्रचंड हाल झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR