मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला मुदत वाढवून दिली आहे. मात्र, राज्यातील विविध भागातील मराठा बांधव आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्यातील अनेक भागात शुक्रवारी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
नाशिकमधील मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी केवळ आमरण उपोषण मागे घेतले आहे. आरक्षणाची लढाई संपलेली नाही. सरकारला दोन महिन्याची मुदत दिली आहे, त्यावेळेत शासनाचे आरक्षण जाहीर करावे, अशा मागणी करण्यात येत आहे.