नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुनव्वर राणा हे प्रसिद्ध उर्दू कवी होते आणि त्यांनी अनेक गझल लिहिल्या आहेत. त्यांचे निर्भय वक्तृत्व त्यांच्या कवितांमधूनही दिसून आले. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगत २०१४ मध्ये त्यांनी उर्दू साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. रविवारी उशिरा लखनौच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते किडनी आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते.
कवी राणा हे उत्तर प्रदेशच्या राजकीय घडामोडींमध्येही सक्रिय होते. त्यांची मुलगी सुमैया अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाची सदस्य आहे.