नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) तंत्रज्ञानाचा वापर रुग्णालयांमध्येही वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तंत्रज्ञान वापरून आता शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आले आहे. रक्ताच्या गुठळ्या झालेल्या रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. देशात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय रुग्णावर गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारात फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसात आणि पायाच्या खोल शिरामध्ये रक्ताची गुठळी असलेल्या ६२ वर्षीय रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, यामुळे मेदांता हे अशा प्रकारचे तंत्रज्ञान स्वीकारणारे देशातील पहिले रुग्णालय ठरलं आहे. फुफ्फुसातील रक्ताची गुठळी काढण्यासाठी देशात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहान यांनी केला आहे.
पल्मोनरी एम्बोलिझमने त्रस्त रुग्ण
अलिकडच्या काळात देशात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, हे याचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे रक्ताचा प्रवाह नीट होत नाही आणि ह्रदयविकाराचा झटका येतो. डॉ.नरेश त्रेहान यांनी सांगितलं की, मेदांता रुग्णालयामध्ये इतर आजारांच्या उपचारांसाठी गेल्या वर्षी जुलैमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत २५ रुग्णांवर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत कमीतकमी रक्तस्त्राव होतो आणि रुग्ण लवकर बरे होतात असे त्यांनी सांगितले. भविष्यात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पल्मोनरी एम्बोलिझमने त्रस्त असलेल्या रुग्णांवर अधिक चांगले उपचार करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.