छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी सरकारच्या आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. गेल्या ९ दिवसांपासून मनोज जरांगे हे अन्नाशिवाय उपोषण करत होते. मध्ये काही दिवस त्यांनी पाणीही घेतले नव्हते. याचा मोठा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला आहे. डॉक्टरांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना उलटी आणि चक्कर आली आहे. किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. त्यांना अशक्तपणा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे यांना प्रकृती चांगली नसल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येत असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीतबद्दल माहिती दिली आहे. डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांची तब्येत काल (गुरुवारी) चिंताजनक होती. ते भरती झाले तेंव्हा त्यांचा बीपी, शुगर कमी झालेला होता. अशक्तपणाही खूप होता. त्यांच्या रक्त चाचण्या आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये असे आढळून आले की, त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आहे. नऊ दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरला इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला त्यांची प्रकृती प्रतिसाद देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला अजून पाच ते सहा दिवस लागतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.