24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात वाढतोय कुष्ठरोग

महाराष्ट्रात वाढतोय कुष्ठरोग

५ वर्षांत ८३ हजारांहून अधिक केसेस

 मुंबई : कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भीती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. कोरोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. आरोग्यसेवा (कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये ८३,२८१ कुष्ठरुग्णांची नोंद झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये पुरुष रुग्णांची संख्या ३८,२०० तर, महिला रुग्णांची संख्या ४५,०८१ आहे. राज्यात एकाही रुग्णाचा यामुळे मृत्यू झालेला नाही.
 आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत (कुष्ठरोग आणि क्षयरोग) यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, यावर्षी राबवण्यात आलेल्या कुष्ठरुग्ण सर्वेक्षण मोहिमेत यापूर्वी पुढे न येणा-या कुष्ठरुग्णांची नोंद झाल्याचे सांगितले. घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे हे शक्य झाले. निदान चाचण्या व वैद्यकीय निदाननिश्चितीमुळे कुष्ठरुग्णांचा शोध घेणे शक्य झाले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या भागांप्रमाणे स्थलांतराचे प्रमाण जिथे अधिक आहे तिथेही रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ होताना दिसते. दाटीवाटीची लोकसंख्या आणि दारिद्र्य या घटकांचा त्यादृष्टीने विचार करायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 आजाराचा स्वीकार न करणे हे मोठे आव्हान
शहरामध्ये पालिकाक्षेत्रात तर, ग्रामीण भागामध्ये विदर्भातील काही विशिष्ट भागांमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण वाढताना दिसते. आजाराचा स्वीकार न केल्यामुळे योग्यवेळी औषधोपचार सुरू न करता येणे हे सर्वांत मोठे आव्हान आज आरोग्य यंत्रणेपुढे आहे. महिलांमध्ये या आजाराचा स्वीकार न करण्याचा कल अधिक दिसतो. शून्य कुष्ठरुग्ण संसर्ग ही मोहीम आता अधिक आग्रहीपणे राबविण्यात येणार आहे. कुष्ठरुग्णांना शोधून काढण्यासाठी राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आल्याने अधिकाधिक रुग्णसंख्येची नोंद यामध्ये झाली आहे. ही मोहीम राबवली नसती तर रुग्णांची नोंद मोठ्या संख्येने झाली नसती. त्यामुळे रुग्णसंख्येच्या नोंदीमुळे धास्तावण्याचे कारण नाही, याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले आहे.
 आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग व क्षयरोग (आरोग्यसेवा) विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आजाराची सांसर्गिक व असांसर्गिक अशी दोन प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. सांसर्गिक स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णांना बारा महिन्यांच्या कालावधीत एमबीएमडीटी व असांसर्गिक रुग्णांवर सहा महिन्यांच्या कालावधीत पीबीएमडीटी हे औषधोपचार केले जातात.
प्रभावी औषधे उपलब्ध
कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी आता प्रभावी औषधांची उपलब्धता आहे. या औषधाची मात्रा घेतल्यानंतर कुष्ठरोगामुळे होणारा संसर्ग नियंत्रणात येतो. या रुग्णांना कुटुंबापासून तसेच समूहापासून वेगळे काढण्याची गरज नाही. त्यांना योग्य उपचाराने पाच महिने ते पाच वर्षे या कालावधीमध्ये कुष्ठरोगमुक्त करता येणे शक्य आहे. या औषधांना कोणत्याही प्रकारचा प्रतिरोध निर्माण झालेला नाही. प्रौढ व मुलांमध्ये वेगवेगळी औषधे दिली जातात. उपचार पूर्ण केले तर आजार पूर्णपणे बरा होतो.
 मुलांमध्येही वाढते प्रमाण
चौदा वर्षांखालील मुलांमध्येही कुष्ठरोगाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये वाढते असून राज्यात वर नमूद केलेल्या कालावधीमध्ये ६०६४ मुलांना कुष्ठरोगाची लागण झाली आहे. त्यात विदर्भ, गडचिरोली, जालना येथील रुग्णसंख्या अधिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR