हैदराबाद : काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक महिलेला दर महिना पेन्शन, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सवलत, सरकारी परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास अशा विविध योजनांद्वारे ४ हजार रुपयांपर्यंतचे लाभ देण्यात येतील असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी सांगितले की, बीआरएस प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लुटलेला सर्व पैसा जनतेला परत करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. विद्यमान सत्ताधा-यांनी केलेल्या घोटाळ्यांचा सर्वांत मोठा फटका तेलंगणातील महिलांना बसला आहे. काँग्रेस सत्तेवर आली तर आम्ही महिलांच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविणार आहोत. तेलंगणात प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यात पेन्शनच्या रूपाने २५०० रुपये जमा केले जातील. स्वयंपाकाचा गॅस ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येईल. त्यासाठी प्रत्येक महिलेकरिता सरकार एक हजार रुपये खर्च करेल.
कालेश्वरमवरून राहुल गांधींचे टीकास्त्र
राहुल गांधी यांनी कालेश्वरम सिचंन योजनेच्या मेडिगड्डा बॅरेजची पाहणी केली. त्यानंतर सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी, कालेश्वरम प्रकल्प म्हणजे केसीआर कुटुंबाचे एटीएम असल्याचा आरोप केला.
विकासासाठी पुन्हा सत्ता द्या : केसीआर
विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर त्यासाठी बीआरएस पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निर्मल येथील प्रचारसभेत सांगितले. २०१४ सालापासून तेलंगणाचा उत्तम विकास झाला आहे. बीआरएसच्या राजवटीत तेलंगणात जातीय दंगली घडल्या नाहीत. संचारबंदीची वेळही आली नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यास बीआरएसच्या उत्तम योजना ते सरकार बंद पाडेल. बीआरएस तेलंगणात पुन्हा सत्तेवर आली तरच विकासाचा प्रवाह असाच पुढे सुरू राहील.