नवी दिल्ली : एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (इपीएफओ) यापुढे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्डला वैध दस्तऐवज मानणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या आदेशानंतर इपीएफओने जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
२२ डिसेंबर २०२३ रोजी, इपीएफओने आधार कार्डचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु तो जन्मतारखेचा पुरावा नाही, असे निर्देश जारी केले होते.
आधार कार्ड ओळख आणि वास्तव्याचा पुरावा
इपीएफओने आपल्या परिपत्रकात म्हटले होते की, आधार हा १२ अंकी आयडी आहे. तो भारत सरकारने जारी केला आहे. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. त्यावर जन्मतारीख दिलेली असते पण ती जन्म पुरावा म्हणून वापरू नये.
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रे
जन्म आणि मृत्यू निबंधकाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त सरकारी मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट, नाव आणि जन्मतारीख असलेले शाळा सोडल्याचा दाखला, केंद्र / राज्य सरकारच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र, आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड, शासनाने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र, सिव्हिल सर्जनने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र.