लातूर : प्रतिनिधी
अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण लातूर शहर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील सर्वच मंदीरांतून महाआरती, शहरात विविध ठिकाणी श्रीरामाची पुजा, प्रसाद वाटपाचे कार्यक्रम झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. युवकांनी दुचाकीवरुन शहरात फे रफटका मारीत ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्या.
या निमित्ताने शहर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंच प्रतिमेचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण संजय बनसोडे, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास खासदार सुधाकर शृंगारे, किरण पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, शहर भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अजित पाटील कव्हेकर, रवी सुडे, शिरीष कुलकर्णी, विवेक बाजपाई, प्रविण कस्तुरे, प्रेरणा होनराव, रागिनी यादव यांच्यासह सर्व मंडल प्रमुख, विविध मोर्चांचे प्रमुख,प्ह्या्रकोष्ट प्रमुख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या सर्व कार्यक्रमांना रामभक्त लातूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पक्ष व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांनी केले. प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त आयोजित या सर्व उपक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
५१ हजार लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. ५१ हजार लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभही उपस्थित मान्यवरांनी केला.
भव्य शोभा यात्रांनी लक्ष वेधले
प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा लातूर शहरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या मुर्त्या, राम मंदीरची प्रतिकृतीच्या भव्य शोभा यात्रा काढण्यात आल्या. या शोभा यात्रा लक्षवेधी ठरल्या.
श्री जय जगदंबा देवस्थानतर्फे महाप्रसाद
येथील गंज गोलाईतील श्री जय जगदंबा देवस्थान समितीच्या वतीने सकाळी १० वाजता श्री प्रभु रामचंद्राच्या प्रतिमेची विधिवत पूजा करुन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाचा शुभारंभ करण्यात आल. याप्रसंगी ज्येष्ठ विश्वस्त माजी आमदार वैजनाथराव शिंदे, उपाध्यक्ष शिवप्पा पारशेट्टी, सचिव बसवंतप्पा भरडे, अॅड. गंगाधरप्पा हामणे, वीरभद्रप्पा वाले, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, कुमारप्पा पारशेट्टी, ओम मेंगशेट्टे यांच्यासह देवस्थान समितीचे विश्वस्त, सदस्य व शेकडो भाविक उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली.