17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeपरभणीऊर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी : जिल्हाधिकारी गावडे

ऊर्स काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी : जिल्हाधिकारी गावडे

परभणी : सय्यद शाह तुराबुल हक ऊर्स १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या ऊर्स काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी गावडे बोलत होते. यावेळी खा. फौजिया खान, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, प्रादेशिक वक्फ बोर्ड अधिकारी खुसरो खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी सय्यद अमिनुज्जमा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ऊर्सकाळात पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, सोयीसुविधांबाबतची माहिती देणारे फलक जागोजागी दर्शनी भागात लावणे, दुकानांचे परवाने सहज मिळावेत यासाठी संबंधित विभागांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देणे, मदत केंद्राचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिले. या काळात विविध परिसरातून संदल निघतात यामध्ये उंटाचा वापर करण्यात येतो या प्राण्यांची पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-यांनी तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

तसेच शहरातील विविध भागातून येणा-या यात्रेकरू अनुयायांच्या प्रवासासाठी एसटी बसेस पुरविणे, अग्निशमन यंत्रणेच्या अधिका-यांकडून यात्रा काळात करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्यानुसार दुकानांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आयोजकांना दिले. वक्फ बोडार्ने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक आणि जिल्हा व पोलिस यंत्रणेसोबत योग्य समन्वय ठेवून यात्रा काळात यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी आयोजकांना केले आहे.

यात्राकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यावसायिक दुकानदारांची संपूर्ण माहिती वेळोवेळी पोलीस विभागाला देणे अनिवार्य राहील. या काळात नाईट व्हिजन कॅमेरे संबंधित ठिकाणी लावणे, एलईडी स्क्रिनची व्यवस्था करणे. या कालावधीत वक्फ बोर्डाने पोलीस यंत्रणेसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी आयोजकांना दिले.

महानगर पालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे ऊर्स काळात महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणा-या सर्व सोयीसुविधांचे शुल्क वक्फ बोर्डाला भरावे लागणार आहे. तसेच महानगरपालीकेच्या रस्त्यांची व रस्त्यांवरील बंद असलेल्या लाईटची दुरुस्ती महानगरपालीका करणार असल्याचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी विविध मागण्या यावेळी प्रशासनाकडे यावेळी केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR