अमरावती : अमरावती शहरात महापालिकेच्या वतीने ज्या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, त्या भागातील झेंडे, बॅनर्स काढण्याचे काम सुरू आहे. अशातच झेंडे काढण्यावरून दोन गटांत वाद झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात लावलेले झेंडे काढण्याची मोहीम राबविली जात आहे. आमचा झेंडा काढला. त्यांचा झेंडा का काढला नाही, असा वाद फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौक परिसरात उफाळून आल्यामुळे मंगळवारी रात्री दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.
काही वेळातच संपूर्ण परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. सोमवारी अयोध्येच्या राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जात असल्यामुळे अमरावती शहरातील जुन्या महामार्गावर फ्रेजरपुरा परिसरात मोठ्या संख्येने झेंडे लावण्यात आले होते. या भागात अनेक दिवसांपासून इतरही झेंडे फडकत आहेत. दरम्यान सोमवारी शहरात ज्या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा भागातील होर्डिंग, पोस्टर आणि झेंडे काढण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबविली. यातच फ्रेजरपुरा परिसरातील एक झेंडा महापालिकेच्या कर्मचा-यांनी काढला. त्यावरून काही तरुणांनी वाद घातला.
यामुळे परिसरातील दोन गट आमने-सामने उभे ठाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. समाज माध्यमांवर पसरणा-या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहनदेखील पोलिस उपायुक्तांनी केले आहे.