लखनौ : आगामी लोकसभेला समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात ८० पैकी ६५ जागा लढेल. समाजवादी पक्षाने आतापर्यंत ज्या पक्षांसमवेत आघाडी केली आहे, त्या पक्षांना कधीही निराश केले नाही आणि संपूर्ण सन्मान दिला आहे. यापुढेही आघाडीतील सहका-यांना कधीही निराश करणार नाही, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवरून समाजवादी पक्षाने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यानुसार सपने उत्तर प्रदेशात निम्म्यापेक्षा अधिक लोकसभा जागा लढण्याचा दावा केला आहे. त्यामुळे ८० पैकी ६५ जागा लढण्याची तयारी सपकडून केली जात आहे. अन्य जागा ‘इंडिया’ आघाडीसाठी देण्यास सप तयार आहे. यासंदर्भात अखिलेश यादव म्हणाले, आतापर्यंत समाजवादी पक्षाने अनेक पक्षांशी आघाडी केली आणि आघाडीतील घटक पक्षांचा संपूर्णपणे सन्मान राहील, असाच प्रयत्न केला गेला. या आघाडीतील साथीदार यापूर्वीही कधी निराश झाले नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. ६५ जागा लढण्याबाबत बोलताना ते म्हणाले, सपच्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सहभागी झाले आणि त्यांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले.
सपने एवढ्या जागा लढवायला हव्यात, असे सांगितले. मात्र सपने आतापर्यंत जेवढ्या आघाड्या केल्या, त्यात कोणीही निराश होणार नाही, असाच प्रयत्न राहिला आहे. आमची रणनिती एनडीएला पराभूत करेल. कारण एनडीएच्या लोकांनी फसवणूक केली आहे. आज पिछडे, दलित अल्पसंख्याक (पीडीए) हे सर्वाधिक पीडित आहेत आणि त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय झाला आहे. मध्य प्रदेशचा मुद्दा आता निकाली लागला असून तो पुन्हा उकरून काढू नका. राज्य पातळीवर कोणतीही आघाडी नाही, हे सिद्ध झाले आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर जी आघाडी आहे ती ‘पीडीए स्ट्रॅटजी’ प्रमाणे काम करेल, असे अखिलेश यादव म्हणाले.