बुलडाणा : शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जाहीर भाषणातून चक्क मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार रायमूलकर यांचा स्वत:वरील ताबा सुटल्याचे यावेळी दिसून आले. रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू, अशी धमकीच रायमूलकर यांनी दिली. यावेळी त्यांनी रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांच्यावरही वादग्रस्त टिप्पणी केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या सभा तसेच राजकीय दौरेही सुरू झाले आहेत. या सभा आणि त्यातील होणा-या आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्याजिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील लोकआग्रहास्तव लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या जोरदार तयारीत आहेत. रविकांत तुपकर हे सध्या जिल्हाभरात ‘एल्गार परिवर्तन मेळावे’ घेत असून गावोगावी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडून लोकसभा लढवण्यासाठी मोठा निधी देखील उभा करत आहेत