देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यात मांजरा पट्टा हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने भूजल पातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात तांबेरा, मर, काणी, बुरशी, आदी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उसाची वाढ होऊ शकली नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० ते ४० टक्के ऊस उत्पादनात घट झाली आहे.
उस हे नगदी पीक आणि भरवशाचे पीक म्हणून ओळखले जाते. गतवर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने, शेतकरी ऊस लागवडीकडे वळले होते मात्र यावर्षी शेतक-यांना फटका बसला आहे. सध्या बोअर व विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने पाण्या अभावी ऊस वाळून जात आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली आहे. दरवर्षी सातत्याने होणारी घट ही शेतक-याचीचिंता वाढवणारी आहे. सध्या गळीत हंगाम केवळ तीन महिने चालेल असा अंदाज वर्तविला जात आहे. पाण्याअभावी ऊस वाळून जात असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात निम्याने घट झाली आहे. खोडवा ऊसाला गतवर्षी ४० टनाचा उतारा मिळत होता. यावर्षी तो २६ टनावर येऊन ठेपला आहे, ऊस उत्पादक शेतकरी विनायक राठोड यांनी सांगितले.