मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरात वीस वर्षीय तरुणीने इमारतीतील घराच्या खिडकीतून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणी लोअर परळ येथील लोढा पार्क रहिवासी संकुलात वास्तव्यास होती. याप्रकरणी एन. एम. जोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मृत तरुणी मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची प्राथमिक चौकशीत माहिती समोर आली आहे.
ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दिवशी तरुणीने तिच्या घराच्या खिडकीतून उडी मारली. तिला रुग्णालयात नेले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.
तरुणीवर मानसिक नैराश्यासाठी वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी या आत्महत्येबाबत कोणावरही संशय नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.