मुंबई : ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास प्रसिद्धीच्या झोतात आला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘सालार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रभासने मोठा निर्णय घेतला आहे. प्रभास काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे. त्याच्या इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्यामागचे कारण देखील समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, प्रभासला त्याच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे विश्रांती घेण्यासाठी त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी मार्च महिन्यात तो कामावर परतेल. अवघ्या एका महिन्याचा तो छोटा ब्रेक घेत आहे. प्रभास सर्जरी करण्यासाठी यूरोपला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रभासला दुखापत झाली होती. ज्यातून अजून तो पूर्णपणे ठीक झालेला नाही. त्यासाठी तो ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत प्रभासने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, प्रभासकडे सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कल्कि २८९८ एडी’ हा चित्रपट आहे. अभिनेता नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ ९ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण, कमल हसन, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत असतील. याशिवाय प्रभास संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो ‘द राजसाहेब’ या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात प्रभाससोबत मालविका मोहन, निधि अग्रवाल दिसणार आहेत.