ब्लोमफॉन्टेन : मुशीर खानच्या (१२६ चेंडूंत १३१ धावा व १० धावांत दोन बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ गटात न्यूझिलंडवर २१४ धावांनी वर्चस्वपूर्ण विजय मिळवला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझिलंडचा डाव ८१ धावांतच आटोपला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझिलंडच्या ऑस्कर जॅक्सन (१९), झॅक किमग (१६), ऍलेक्स थॉम्पसन (१२) व जेम्स नेल्सन (१०) वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून फिरकीपटू सौम्य पांडेने (४/१९) चांगली गोलंदाजी केली. त्याला राज लिम्बानी (२/१७), मुशीरने चांगली साथ दिली. नमन तिवारी व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत विजयात योगदान दिले.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अर्शिनच्या (९) रूपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर सलामीवीर आदर्श सिंग (५२) व मुशीर यांनी दुस-या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सुस्थितीत पोहोचवले. आदर्श बाद झाल्यावर कर्णधार उदय सहारनने (३४) मुशीरच्या साथीने संघाच्या धावसंख्येत भर घातली. सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले. न्यूझिलंडकडून मेसन क्लार्कने (४/६२) चांगली गोलंदाजी केली.