मुंबई : मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणा-या कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमिटर रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच, १५ मेपर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास २९ किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे. जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्य
सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण ४ किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे १६०० वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.