मुंबई : उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात आता विरोधकांकडून सरकारवर टीका होताना पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तर, पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाहीत असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सर्व गुंडाराज सुरू आहे, महाराष्ट्राचा बिहार करायच्या दृष्टिकोनातून हे सर्व केले जात आहे. एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून, दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहात. या लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्यांना अटक देखील केली जात नाही. हे पहिल्यांदाच असे घडत नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. आधीपण गोळीबारासारख्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालं नाही जे आज घडलं आहे.
या सर्व गोष्टींचा निषेध आहे. दु:ख याचं आहे की, यांनी जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवली आहे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे सुरू आहे, त्याचे हे कारण आहे. गृहमंत्री तसे पटकन येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, पण आज ते दिसत नाहीत. अशा गोष्टी सहन कशा केल्या जातात.. महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही ठाकूर म्हणाल्या.