नवी दिल्ली : अंडर १९ विश्वचषकात भारतीय युवा संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सुपर ६ सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा १३२ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने लागोपाठ पाचव्या विजयाची नोंद केली आहे. सुपर ६ च्या पहिल्या सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने न्यूझिलंड संघाचा २१४ धावांनी पराभव केला आहे.
सुपर ६ सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात २९७ धावांचा डोंगर उभारला. सचिन धस याने ११६ धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार उदय सरहन यानेही शतक ठोकले.
फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर गोलंदाजांनीही आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. गोलंदाजांनी नेपाळला १६५ धावांपर्यंत रोखले. सोम्य पांडे याने २९ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय अर्शिन कुलकर्णी याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. सचिन धस याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.