सोलापूर- सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिका नंतर सोलापूर महानगरपालिकेचे इमारत ही एकमेव हेरिटेज(ऐतिहासिक वास्तू) इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन येथे झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, माजी आमदार दीपक आबा साळूंखे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, माजी गटनेते किसन जाधव,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचे सूक्ष्म निरीक्षण केले. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली.
प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या इमारतीचे नूतनीकरण महापालिकेने अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचे कौतुक केले. तसेच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटी बद्दल महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना दिल्या. तसेच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेने उचित पावले उचलावी असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सोलापूर महापालिकेने इंद्रभुवन इमारतीचे केलेल्या नूतनीकरण विषय कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदय यांना दिली. राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिके नंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महापालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले. या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचे नूतरीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.