लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत गुजरात आणि मध्यप्रदेशहून लसणीची आवक होते. सध्या बाजारात जुन्या लसणाचा शेवटचा हंगाम असल्याने लसणीची आवक कमी झाली आहे. पालेभाज्यांच्या स्थिर असलेल्या किमतीनंतर गृहिणी आंनदात असल्या तरीही आता लसणीच्या वाढत्या दराने खिशाला कात्री बसत आहे. भाज्यांसह सगळ्याच पदार्थात लसूण वापरला जात असल्याने आता गृहिणींना लसणीच्या तडक्याबाबत हात आखडता घ्यावा लागणार आहे. तर भाव वधारल्याने लसनाविना फोडणी दिली जात आहे. स्वस्त असलेल्या लसणाच्या दरात आता मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दैनदिन जीवनात रोजच्या भाजीला स्वादाची फोडणी देणारा लसूण महागला असून घाऊक बाजारात एक किलोचा दर चारशे रुपयांपर्यंत गेला आहे. संकरित लसणाचे मोठे उत्पादन घेणा-या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये पिके वाया गेल्यामुळे आवक घटली आहे. दुसरीकडे देशी वाणही बाजारातून गायब झाल्याने लसणाच्या दरावर परिणाम झाला आहे. लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, देशी वाण असलेला औषधी लसूण दुर्मीळ झाला आहे. याला पर्याय म्हणून राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील इंदूर येथून संकरित लसणाची आवक बाजारात होते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे लसणाचे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी तीस ते चाळीस रुपये किलो असलेला लसूण आता चारशेच्या घरात पोहचला आहे. देशी लसूण विक्रीसाठी येण्यास एक ते दोन महिन्यांचा अवधी असल्याने या महागाईत आणखी भर पडली आहे. संकरित लसणासाठी किलोला अडीचशे ते तीनशे रुपये तर देशी लसणासाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारी अखेपर्यंत लसणाचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापारी अरबाज बागवान यांनी व्यक्त केली.
सध्या बाजारत भाजीपाल्याचे दर समाधानकारक आहेत. जिल्हयासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात. काकडी, दोडकी, वागें, गवार, मेथी, कोथिंबीर तसेच अदि पालेभाज्या बाजारात दाखल होतात त्यांचे दर स्थिर असून पालेभाज्यांना चांगली मागणीही आहे. पंरतु गवार, लिंबूच्या दरात अल्पशा वाढ झाली आहे. तर इतर पालेभाज्याचे दर मागील गेल्या एक महिन्यापासून स्थिर असल्याचे व्यापारी मिनाझ बरगवान यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे.