मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा कडाक्याचा गारठा पडणार आहे. उत्तर भारतात थंड हवेचा जोर कमी झाल्याने थंडी कमी झाली होती. पण, उत्तरेकडील हवेचा जोर कमी-जास्त होतोय. सध्या थंड हवेचा जोर वाढला आहे. त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी राज्यात निर्माण होऊ शकते. सोमवारनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होईल.
राज्यातील कोरड्या हवामानामुळे थंडी वाढणार आहे. पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चार चे पाच अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. वा-यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही होणार आहे. राज्यात शनिवारी पुण्यात १२.६ डिग्री सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फ पडत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षावामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिल्तीत रविवारी सकाळी पाऊस पडला. दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्किमचे किमान तापमान ६-१० डिग्री सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील पडणार असून राज्याचे तापमान कमी राहील.