20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रआव्हान द्याल तर दोनच आमदार शिल्लक राहतील

आव्हान द्याल तर दोनच आमदार शिल्लक राहतील

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा या पुढे करू नये. या पुढे फडणवीस यांना आव्हान द्याल तर निवडून आलेल्या २० आमदारांपैकी १८ जण तुमची साथ सोडून निघून जातील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा कायम सन्मानच केला आहे. पक्षभेद न पाळता सर्व आमदारांना संपूर्ण सहकार्य केले मात्र २०१९ पासून सातत्याने उद्धव ठाकरे यांनी त्याची जाणीव न ठेवता फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा केली. नागपुरात येऊन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची अनामत रक्कमही निवडणुकीत जप्त होईल, अशी भाषा वापरली होती.

उद्धव ठाकरे यांनी या पूर्वी ज्या ज्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे त्या त्या वेळी ते तोंडावर आपटले आहेत तर देवेंद्र फडणवीस तळपत्या सूर्याप्रमाणे अधिक शक्तिशाली झाले आहेत; पण त्यातून उद्धव ठाकरे यांनी काहीच धडा शिकलेला नाही. अजूनही उद्धव ठाकरे फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा करत असतील तर त्यांच्याकडे दोनच आमदार शिल्लक राहतील याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे बावनकुळे यांनी बजावले.

दरम्यान, पक्षाच्या प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीची तसेच जिल्हाध्यक्षांची बैठक सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानावर विस्ताराने चर्चा झाली. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार नवीन प्राथमिक सदस्य करण्याचा तसेच ५०० सक्रीय कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

महानगरपालिका जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत कोठेही सत्ता मिळणार नाही, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR