मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार गटाने मागणी केली आहे की, विरोधी पक्षाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी अजित पवार गटाला देखील मिळावी.
सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दोन गटात वाद सुरू आहे. या वादावर सुनावणी घेत निवडणूक आयोगाने अजित पवार गट खरी राष्ट्रवादी असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार यांना देण्यात आले.
दरम्यान शरद पवार गटाने याबद्दल नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीमधील त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध केला, आणि कोर्टात जाणार असल्याचे म्हटले होते.
आता अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल करत सर्वोच्च न्यायालयात शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये असे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोस्टर देखील लावण्यात आले. या पोस्टरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या फोटोसह ‘चिन्ह तुम्हारा, बाप हमारा’ असा मजकूर लिहीला आहे.