नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी दिल्लीत मेट्रोने प्रवास केला. राष्ट्रपतींच्या प्रवासाचा एक व्हीडीओही सोशल मीडियावर समोर आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. या प्रवासादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याभोवती सुरक्षा अधिकारी आणि कर्मचा-यांनी गराडा घातला होता. तर डीएमआरसीचे उच्चपदस्थ अधिकारी राष्ट्रपती मुर्मू यांना मेट्रोच्या कामकाजाची माहिती देत होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केल्यानंतर काही वेळातच ही व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, व्हीडीओत पिवळ्या रंगाची साडी घातलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मेट्रोने प्रवास करण्याचा आनंद घेत आहेत. यावेळी काही फोटोग्राफरही हजर होते जे राष्ट्रपती मुर्मू यांचे फोटो काढत होते. तर प्रवासादरम्यान डब्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली होती. दिल्लीकर दररोज मोठ्या संख्येने मेट्रोने प्रवास करतात.