परभणी/प्रतिनिधी
तालुक्यातील सोन्ना या गावात आयोजित केलेल्या सप्ताह दरम्यान मंगळवारी रात्री एकादशी निमित्त भगर खाल्लेल्या सुमारे ५०० पेक्षा अधिक ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागासह अन्य यंत्रणांनी मोठी सतर्कता दाखवून या ग्रामस्थांना तात्काळ सरकारी व खाजगी रुग्णालयात हलवून युध्दपातळीवर उपचार सुरु केले आहेत. दरम्यान या घटनेतील बालकांसह अबालवृध्द व महिला पुरुषा रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
परभणी तालुक्यातील सोन्ना या गावातील ग्रामस्थांनी एकादशीचे औचित्य साधून भगर व आमटीचा बेत केला होता. मंगळवारी रात्री जवळपास ५५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी फराळाचा आस्वाद घेतला. परंतू रात्री उशीरा यातील काही ग्रामस्थांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी धावपळ करीत परभणी शहर गाठले. एका पाठोपाठ एक अनेक रूग्ण तक्रारी घेवून जिल्हा शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल होवू लागल्याने गावात मोठी खळबळ उडाली. तेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ युध्द पातळीवर यंत्रणा हलवली.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंदसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र गिते, जिल्हा शल्य चिकत्सक नागेश लखमावार आदींनी तात्काळ बेड, पुरेशी औषधी तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचा-यांची टीम तैनात केली. एका पथकाने सोन्ना गाठून त्याच ठिकाणी उपचार सुरु केले. रात्री उशीरापर्यंत जिल्हा रुग्णालयात जवळपास ३००च्या आसपास रुग्ण दाखल झाले होते. तर खाजगी रुग्णालयात जवळपास १०० ते १५० रुग्ण दाखल झाले होते. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांपैकी ३० ते ४० बालकांचा व जवळपास १५० पेक्षा अधिक वृध्द पुरुष-महिला रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांना योग्य तो उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. दरम्यान या घटनेचे सोन्ना गावासह संपूर्ण जिल्ह्यात मात्र खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.