31 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसंपादकीय विशेषविज्ञानातील रुची का घटतेय?

विज्ञानातील रुची का घटतेय?

देशातील शास्त्रज्ञांना आपण खेळाडू, अभिनेता, नोकरदार किंवा एखाद्या नेत्याप्रमाणे आदर्श समजत नाहीत. अनेक पातळीवर विज्ञानापेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी पुरेसा सन्मान मिळत नसल्याने तरुण शास्त्रज्ञ परदेशात निघून जात आहेत. साहजिकच हे चित्र बदलण्यासाठी देशात संशोधन आणि शोध याची संस्कृती विकसित व्हावी असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

ही दिवसांपूर्वीच्या एका संशोधनात दक्षिण भारतातील विद्यार्थी विज्ञान विषयाला प्राधान्य देतात तर उत्तर भारतातील विद्यार्थी कला वर्गातील विषयाला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार २०२२ मध्ये अकरावी आणि बारावीच्या विविध राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अनुक्रमे १.५३, २.०१ आणि २.१९ टक्के विद्यार्थ्यांनी कला अभ्यासक्रमाच्या विषयांना महत्त्व दिले तर त्याचवेळी पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि झारखंडमध्ये विज्ञान विषयाला अनुक्रमे १३.४२, १३.७१, १५.६३, १८.३३ आणि २२.९ टक्के विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली. याउलट कला विषयाला गुजरातमध्ये ८१.५ टक्के, बंगालमध्ये ७८.९४ टक्के, पंजाबमध्ये ७२.८९ टक्के, हरियाणात ७६.७६ टक्के आणि राजस्थानात ७१.२३ टक्के विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच ‘एनसीईआरटी’चा सहयोगी विभाग ‘परख’ सध्या या आकडेवारीचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विश्लेषण करणार आहे. परंतु समाज आणि शिक्षणतज्ज्ञांनी देखील या आकडेवारीचा अभ्यास करण्याची गरज आहे. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा व्यक्तींवर आणि समाजाच्या प्रत्येक पातळीवर प्रभाव पडत असताना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हस्तक्षेप वाढत असताना विज्ञान आणि कला विषयावरून असणारी असमानता चिंताजनक कशामुळे? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात शास्त्रज्ञांची कमतरता राहण्याचे मूळ कारण देखील या विसंगत आकडेवारीत दडलेले आहे. शिवाय मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात पेटंटची संख्या वाढण्याची गती ही कशामुळे संथ राहत आहे, हे देखील कळते.

विज्ञानाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी देशातील बहुतांश सर्व आघाडीच्या संस्थांत शास्त्रज्ञांची उणीव भासते. सध्याच्या काळात देशात ७० प्रमुख संशोधन संस्था असून त्यातील ३२०० पदे रिक्त आहेत. बंगळुरू येथील विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएलआयआर) संबंधित संस्थांत सर्वाधिक १७७ जागा रिक्त आहेत. पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (एनसीएल) येथे १२३ शास्त्रज्ञांच्या जागा रिकाम्या आहेत. विशेष म्हणजे सरकारकडून भरपूर सुविधा, सवलती आणि आकर्षक पॅकेज दिले जात असतानाही या जागा रिक्त राहत आहेत. त्याचबरोबर परदेशात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांना स्वदेशी आल्यास आकर्षक वेतन आणि भत्ते देण्याचा प्रस्ताव आहे. असे असतानाही विद्यार्थी भारतात संशोधन करण्यास तयार नाहीत. परिणामी परदेशातून शास्त्रज्ञही मायदेशी परतताना दिसत नाहीत. अशी स्थिती तयार होण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे एकतर शास्त्रज्ञांमध्ये सरकारच्या प्रस्तावावर विश्वास नसल्याचे दिसते. कारण या सुविधा पुढेही कायम राहतील, यावर त्यांना खात्री नाही आणि दुसरे म्हणजे नोकरशाहीकडून आडकाठी आणण्याची प्रवृत्ती. त्यामुळे शास्त्रज्ञ मायदेशी येण्यास बिचकत आहेत.

सध्याच्या काळात कोणताही देश हा शास्त्रज्ञांच्या भरीव कामगिरीच्या आधारावर सक्षम अणि प्रबळ होण्याची क्षमता राखतो. मानवी जीवन सुस करताना संशोधन सुखद आणि समृद्ध करते. भारतात तरुण प्रतिभा किंवा शिक्षित बेरोजगारीचा भडिमार आहे. तरीही शास्त्रज्ञ होण्यात किंवा संशोधन करण्यात रस घेणा-या तरुणांची संख्या ही कमीच राहत आहे. यामागचे आणखी एक कारण म्हणजे शास्त्रज्ञांना आपण सेलिब्रिटीप्रमाणे समजत नाहीत. अनेक ठिकाणी विज्ञानापेक्षा खेळाला अधिक झुकते माप दिले जाते. प्रतिष्ठा न मिळणे, सन्मान न मिळणे या कारणांमुळे देखील शास्त्रज्ञ देशाबाहेर जात असल्याचे आढळून येते. साहजिकच आपल्याला शास्त्रज्ञाप्रती आणि संशोधनाप्रती सकारात्मक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. देशाच्या, मानवाच्या विकासासाठी अहोरात्र संशोधन कार्यात असलेल्या व्यक्तींना महत्त्व देणे गरजेचे आहे. मात्र काहीवेळा शास्त्रीय ज्ञान नसल्याने त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळत नाही आणि त्यांच्या पदरी निराशा पडते. वास्तविक आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सरकारचे वर्चस्व आहे आणि त्यामुळे जोखीम घेण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. शास्त्रज्ञांचे संशोधन हे कल्पकता, पारदर्शकतेवर अवलंबून असते. या गोष्टी जोखीम उचलल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

आज जागतिकीकरणाच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाला अधिक महत्त्व दिले जात आहे. परंतु उदारमतवादी अर्थव्यवस्थेची दुसरी नुकसानकारक बाजू म्हणजे आपल्या उच्च दर्जाच्या विज्ञान शिक्षण संस्था या हुशार लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरताना दिसत नाहीत. आपल्यातील बुद्धिवंत एकतर परदेशात जात आहेत किंवा इंजिनीअरिंग करत एमबीए करत खासगी बँका, विमा कंपन्या किंवा अन्य व्यवस्थापन संस्थेत रुजू होताना दिसतात. म्हणजेच प्रतिभावान लोक शास्त्रोक्त आणि पायाभूत शिक्षण घेऊनही करिअर साकारताना त्यांना अगदी उलट काम करावे लागते. म्हणजेच अभियंता हा बँकर होतो तर डॉक्टर प्राध्यापक होतात. असे विरोधाभासात्मक चित्र आणि संस्कृती पाहिल्यास ही एकप्रकारे प्रतिभावान लोकांची हेटाळणी केल्यासारखी आहे. एकेकाळी विज्ञान संस्थांत पैशाची चणचण असायची. मात्र आता या संस्थांकडे निधी अणि स्रोतांची विपुलता असतानाही तरुण शास्त्रज्ञ याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आपली संशोधन कार्यात आणि संस्कृतीत पीछेहाट राहू शकते. आजच्या काळात होणा-या संशोधन आणि शोधाचे आकलन केल्यास ते मागच्याच काळात झालेल्या शोधांची सुधारित आवृत्ती दिसून येते. थोडाफार बदल करून ते पुन्हा नव्याने आणण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. अर्थात ही प्रवृत्ती चिंताजनक आहे. जगातील आघाडीच्या २०० विद्यापीठांत भारताच्या संस्था जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

१९३० मध्ये भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि तेव्हा संशोधनाची पायाभूत सुविधा असून नसल्यासारखी होती. विचारांना दिशा देणारे साहित्य देखील पुरेसे नव्हते. इंग्रजी शिक्षण देखील बाल्यावस्थेत होते. तरीही सी. व्ही. रमण यांनी साध्या उपकरणाच्या आधारे तसेच देशातील उपलब्ध ज्ञान अणि भाषेचा आधार घेत संशोधन कार्य केले आणि भौतिकशास्त्रात देशाला नोबेल मिळवून दिले. सत्येंद्रनाथ बसू यांनी आईन्स्टाईन यांच्यासमवेत काम केले. मेघनाद साहा, रामानुजन, पी. सी. रे आणि होमी जहाँगीर भाभा यांनी देखील संशोधनात अतुलनीय योगदान दिले. रामानुजन यांनी मांडलेल्या थेरमचा अर्थ आजही शंभर वर्षांनंतरही लवकर समजत नाही. डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि के. शिवम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन संशोधनात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जगदिशचंद्र बोस यांनी स्वत: तयार केलेल्या उपकरणाच्या माध्यमातून झाडांच्या आयुष्याचा शोध घेतला आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला. आता उच्च शिक्षणात अनेक प्रकारच्या गुणवत्तापूर्ण सुधारणा होऊनही दर्जेदार नवीन संशोधन करताना अडचणी येत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपण अजूनही पाश्चिमात्त्यांचा प्रभाव झुगारलेला नाही. अर्थात भारताने अंतराळ मोहिमेत मोठी कामगिरी केली आहे. यात स्वदेशी उपकरणांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.

वास्तविक गेल्या सात दशकांतील शिक्षण प्रणालीतील घोकंपट्टीचा प्रघात हा मोठा अडसर ठरत आहे. म्हणूनच पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांत तार्किकता, आकलनशक्ती किंवा क्षमता, संशोधनवृत्ती, मूल्यमापन क्षमता विकसित होऊ शकली नाही. दुसरे म्हणजे संपूर्ण शिक्षण हे विचारवंत आणि ज्ञानाभिमुख करण्याऐवजी नोकरी अणि करिअरच्या दृष्टीने विकसित केले आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत कल्पनाशक्तीला चालना देणा-या स्रोतांचा शोध घेण्याची प्रवृत्ती विकसित करणारे अध्यापन कौशल्य अभावाने दिसते. इंग्रजीचा दबाव देखील नैसर्गिक प्रतिभावंतांना संकुचित करत आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपान यासारख्या अन्य देशांच्या तुलनेत आपली संशोधन क्षेत्रातील पीछेहाट पाहता त्यांच्याकडून शिकायला हवे. संबंधित देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे त्यांच्या मातृभाषेतून दिले जाते.

परदेशात संशोधन आणि शोधकार्य हे विद्यापीठ पातळीपासून सुरू होते. शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला विद्यार्थी एखादे संशोधन करत असेल तर त्याचे यश तेथील संस्था मान्य करतात आणि त्याला विकसित करतात. आपल्याकडे अशा कार्यांना मान्यता देणे किंवा प्रोत्साहन देण्याचे होत नाही. देशात जोपर्यंत शास्त्रज्ञांना अनुकूल वातावरण तयार होत नाही आणि संस्कृती विकसित होत नाही, तोपर्यंत अन्य देशांच्या तुलनेत आपण पुढे जाणे शक्य नाही. त्याचवेळी देशात तरुण शास्त्रज्ञही तयार होणार नाहीत. विज्ञानाची गोडी लावणारा आणि संशोधन कार्यास प्रोत्साहित करणारा अभ्यास नसल्याने अशा प्रकारच्या कटूसत्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

– प्रा. विजया पंडित

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR