पुणे : राज्यात एसटी कर्मचा-यांचा दीर्घ संप वर्षापूर्वी झाला होता. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचा-यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी शासनाकडून या संपाच्या हाकेनंतर पावले उचलली गेली आहे. राज्य शासनाने आंदोलनाच्या इशा-यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. त्यात एसटी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून अनेक मागण्यांसाठी एसटी महामंडळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशा-यानंतरही कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचा-यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यात सर्वत्र एसटीची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धत रद्द करणे, दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देणे हे प्रमुख मुद्यांसाठी काम बंद पुकारले होते.
राज्य सरकारकडून चर्चेची तयारी
एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलनाच्या इशा-यानंतर राज्य सरकारने पावले उचलली आहे. सरकारने गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसू नये यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघटनेकडून देखील आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.