16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायतीमध्ये महायुती सुसाट?

ग्रामपंचायतीमध्ये महायुती सुसाट?

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पार पडलेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले. यामध्ये महायुतीने निर्विवादपणे वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असून त्याखालोखाल राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) या पक्षांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, महाविकास आघाडीला तुलनेने कमी जागा मिळाल्याने महायुतीच्या तुलनेत आघाडी दुर्बल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परंतु ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. त्यामुळे या आकडेवारीचा दावा खरा नसतो, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.

सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपने ६९७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला तर शिवसेना (शिंदे)- २८९, राष्ट्रवादी (अजित पवार)- ३९२ ग्रामपंचायती जिंकल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-२७१, शरद पवार गट १४५ आणि उबाठा गटाने ११० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला.

राज्यात भाजपने केलेला महायुतीचा प्रयोग सध्या तरी यशस्वी झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण महायुतीकडे दुपारपर्यंत १२७७ ग्रामपंचायती आलेल्या आहेत तर महाविकास आघाडीकडे ४९७ आणि इतरांकडे ३४१ ग्रामपंचायती गेल्या. आजचे निकाल म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भाजपला बळ देणारे ठरत आहेत.

शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदेंनी ४० आमदार सोबत घेत भाजपला समर्थन दिले होते. भाजपनेही शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. मुळात शिवसेना आणि भाजपची ३० वर्षांची युती असल्यामुळे ते बंड गाजले असले तरी त्यावर अघोरी टीका झाली नाही.
याउलट अजित पवारांच्या बंडानंतर ही अभद्र युती असल्याची टीका झाली. अजित पवारांना सोबत घेण्यामागे भाजपची नेमकी खेळी काय? यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी भूमिका मांडल्या. त्यात विशेषत: भाजपला आगामी लोकसभेची धास्ती असल्याचे सांगितले जात होते. परंतु या महायुतीला खरेच लोक स्वीकारतील का, असा प्रश्न उपस्थित झाला. पुणे आणि बीडमध्ये अजित पवार गटाने बाजी मारली. पुण्यात सर्वत्र अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ३२ पैकी २३ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने जिंकल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR