नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.६ इतकी मोजली गेली.
तीन दिवसांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी माध्यमांना सांगितले की, ३ नोव्हेंबरला झालेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये १४ धक्के बसले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप होता. दिल्लीत दोन ते तीन धक्के बसले असून त्याची तीव्रता ४.१ इतकी होती. हे काही दिवस असेच सुरू राहील. आफ्टरशॉकची तीव्रता कमी आहे. ते म्हणाले की, जेंव्हा मोठा भूकंप होतो, तेंव्हा काही दिवस हादरे बसत राहतात. दिल्लीत १० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.
नेपाळमध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्याचा परिणाम दिल्ली एनसीआरमध्येही दिसून आला. सोमवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात नेपाळसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. नेपाळमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात शेकडो लोक मरण पावले असून हजारो बाधित झाले आहेत. नेपाळ जगातील सर्वात सक्रिय टेक्टोनिक क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यामुळे ते भूकंपांसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
१५७ जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. नेपाळमध्ये २०१५ मध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यात सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला आणि २२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.